साबुदाणा उत्पादनात लक्षणीय वाढ   

किलोच्या दरात ७ ते ८ रूपयांनी घट

पुणे : जून महिन्यापासून विविध प्रकारचे सण आणि उत्सवाला सुरूवात होत असते. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांनाही मागणी वाढत असते. यंदा उपवासासाठी लागणार्‍या साबुदाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत किलोच्या दरात ७ ते ८ रूपयांनी घट झाली आहे. अशी माहिती व्यापारी आशिष दुगड यांनी रविवारी दिली. 
 
मार्केटयार्डातील भुसार विभागात रोज ८० ते ९० टन साबुदाणाची आवक होत आहे. ही आवक तामिळनाडूतील शेलम या भागातून होत आहे. मागील वर्षी पाऊस चांगला झाला होता. साबुदाणासाठी वातावरण पोषक होते. त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे उत्पादनात या महिन्यात पालखी सोहळा, आषाढी एकादशी, त्यानंतर श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र सण येणार आहेत. या सणांच्या काळात उपवासासाठी म्हणून साबुदाणाला ग्राहकांकडून मागणी वाढत असते. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत साबुदाणाची आवक होत आहे. मात्र सणाच्या काळात दरात काही प्रमाणात वाढ होणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला आहे. 
 
मागील वर्षी दर आणि आताचे दर जवळपास सारखेच आहेत. सणाला सुरुवात झाल्यानंतर मात्र साबुदाणाच्या मागणीत वाढ होईल. सद्य:स्थितीत हॉटेल चालक, साबुदाणा वडे विक्रेते तसेच घरगुती ग्राहक आदीकडून मागणी आहे. साबुदाणाच्या तुलनेत मात्र भगरचा मिलेट प्रकारात समावेश करण्यात आला असल्यामुळे भगरचे सातत्याने वाढ होत आहे. उत्सव आणि सण काळात भगरीचे दरही वाढणार असल्याचा अंदाजही आशिष दुगड यांनी व्यक्त केला. 

साबुदाण्याचे घाऊक बाजारातील दर 

वर्ष               दर
२०२४ ६१०० ते ६३००
२०२५ ५१०० ते ५३००
 

Related Articles